मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची एसटीला धडक; दहा प्रवासी जखमी

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नाही. दि. 14 मे रोजी मुगवली गावच्या हद्दीय एसटी व ट्रकमध्ये अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ट्रक चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक (एमएच-08-एपी-7093) हा भरधाव वेगाने, हयगयीने, बेदरकारपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रस्त्याच्या विरुद्ध बाजूला चालवित माणगाव बाजूकडे येणाऱ्या कोल्हापूर-रोहा एसटी बसला ठोकर दिली. बसचालक फिर्यादी बापू पठाडे यांनी ट्रकला वाचाविण्याकरिता त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच-20-बीएल-3011) ही रोडच्या उजवे बाजूला असतानाही ट्रकचालकाने बसला धडक दिली. या अपघातात एसटीमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, आरोपी ट्रकचालक ट्रक तेथेच सोडून फरार झाला आहे.

या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. किर्तीकुमार गायकवाड करीत आहेत. जखमी रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हा व्यवस्थापक रायगड कांचन बिडवे यांनी दिली आहे.

अपघातातील जखमी व्यक्ती : रमेश गणपत घोणे (70), रा. कोलाड, ज्ञानेश्वर नथुराम राऊत (42) रा. कळमजे ता. माणगांव, छाया पांडुरंग पेंढणेकर (40), रा. मांदाड, यशोदा तुकाराम भोसले, (65), रा. सातारा, सारिका मनोज कांबळे (44), रा. सातारा, रनजीत मधु वाढवळ (35), रा. कळमजे ता. माणगांव, सुशील बाबुराव माने (37), रा. सातारा राजेश्री बाबुराव माने, रा.सातारा, रंजना तुकाराम भोसले (23), रा. सातारा, काशिबाई लक्ष्मण साळुंखे (75), रा. सातारा.

Exit mobile version