ट्रकची दुचाकीला धडक; तरुणीचा जागीच मृत्यू

दुचाकीस्वार जखमी

। माणगाव । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (17) एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकची दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून चार किलोमीटर असणाऱ्या गारळ गावच्या हद्दीत शनिवारी (17) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. वसंत बाळू भिसे हे आपल्या टीव्हीएस ज्यूपिटर स्कुटीवरून सोनाली धनंजय भिसे (29) यांना घेऊन महाडवरून रोहा-धाटाव येथे चालले होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने स्कुटीला मागून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, स्कुटीवर मागे बसलेली तरुणी सोनाली भिसे हीचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटीचालक वसंत बाळू भिसे हे जखमी झाले असून या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपी ट्रकचालक रुपेश सूर्यकांत इनामदार (44) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.

Exit mobile version