| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावपासून चार किलोमीटर असणार्या गारळ गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाच्या पुढे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची ज्यूपिटर स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू होऊन दुचाकी स्वार जखमी झाला.
अपघात शनिवारी (दि.17) रोजी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबातची फिर्याद वसंत बाळू भिसे (60 ) सध्या रा. रापीजी कॉम्प्लेक्स महाड, मूळ रा. वांगणी, ता. रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यांतील फिर्यादी वसंत बाळू भिसे हे त्यांच्या मालकीची टीव्हीएस ज्यूपिटर स्कुटी महाड ते धाटाव मार्गावर जात होते. यावेळी सोनाली धनंजय भिसे (29) सध्या रा. रापीजी कॉम्प्लेक्स महाड, मूळ रा. वांगणी, ता. रोहा ही मागे बसली होती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाने मोटारसायकलवरुन जात असताना आरोपी रुपेश सूर्यकांत इनामदार (44) रा. नंदीमाळ नाका, ता. पेण याने त्याच्या ताब्यातील ट्रक अतिवेगाने चालवून स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीच्या पाठीमागे बसलेली तरुणी सोनाली धनंजय भिसे हिचा जागीच मृत्यू झाला, तर स्कुटी चालक वसंत भिसे हे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.