अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
| रसायनी | वार्ताहर |
दांडफाटा येथे कांबळे यांच्या मालकीच्या जागेतील फोर व्हीलर गॅरेजच्या आवारात शुक्रवार, दि. 3 रोजी दुपारच्या सुमारास दोन सैनी रोडव्हेजचे ट्रक उभे होते. याचवेळी अचानक वणव्याची आग या गॅरेज परिसरात आल्याने तेथे एम एच-04, सीजी-2111 या ट्रकने पेट घेतला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुसरा एम एच-04, डिके-3011 ही बाजूला करण्यात यश आले. याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दल, रिलायन्स इंडस्ट्रीज अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अर्धा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एम सिजी 2111 हा ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच ओसाड जागेवरील टायर जाळून खाक झाले आहेत. हवेत तासभर धुराचे लोळ पसरले होते. रसायनी तसेच आसपासच्या परिसरात वणवे लागण्याच्या घटनांत सध्या वाढ होत आहे. यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वणवे लावणार्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.