खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील वन तपासणी नाक्यावर 10 हजार 433 रूपये किंमतीचे खैराच्या तुकड्यांचे 77 नग ट्रकसह जप्त करण्यात आल्याची माहिती रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी दिली. वन तपासणी नाका पोलादपूर येथून खैराची अवैध वाहतूक हणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच-11-एएल-2050)ची तपासणी वनविभागाने केली. ट्रकमध्ये खैराचे 10 हजार 433 रूपये किंमतीचे 77 तुकडे आढळून आले. सर्व तुकडे विना परवाना मुद्देमाल आढळून आल्याबद्दल चालक विजय महादेव मांजरेकर रा.शिरगांव, ता.चिपळूण व इतर चार इसम यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करून ट्रक आणि खैराचे तुकडे असा सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये वनविभागाचे प्रभारी वनपाल संदीप परदेशी, नवनाथ मेटकरी,सचिन मेने, निलेश नाईकवाडे, वनरक्षक प्रियांका जाधव, अमोल रोकडे, वाहनचालक लोखंडे यांनी कामगिरी बजावली.

Exit mobile version