सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

बीबी-सावरोली-खारपाडा मार्गावरील कुंभिवली येथे शनिवारी सकाळी गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी होऊन ओढ्यात कोसळल्याची घटना घडली. ट्रकमध्ये सुमारे 350 गॅस सिलिंडर असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्व सिलिंडर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच 14 एलएक्स 3706) क्रमांकाचा ट्रक चावणे येथून सुमारे साडेतीनशे गॅस सिलिंडर घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता. कुंभिवली परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता सोडून थेट ओढ्यात कोसळला.

अपघातामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बाधित झाली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठाही बंद ठेवण्यात आला. हेल्प फाऊंडेशनचे केमिकल तज्ज्ञ धनंजय गीध यांनी घटनास्थळी पाहणी करून सर्व सिलिंडर सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. या मार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून, येथे कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version