तृप्तीची कांस्यपदकाला गवसणी

| रसायनी | प्रतिनिधी |

गचिबावली स्टेडियम हैदराबाद येथे आयोजित 11 व्या अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर स्पर्धा 2026 अंतर्गत झालेल्या तायक्वांदो स्पर्धेतील महिला 67 किलो खालील वजनगटात महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू तृप्ती तुषार सिनलकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पोलीस दल सहभागी झाले होते. यातील विजेते खेळाडू जागतिक पोलीस आणि फायर क्रीडा स्पर्धा 2027, ऑस्ट्रेलिया करीता पात्र होणार आहेत.

स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यानंतरही तृप्ती यांनी हार न मानता जिद्द, चिकाटी आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर आपली लढत सुरू ठेवत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलासह तायक्वांदो क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचबरोबर, शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच झालेल्या 5व्या इंडिया तायक्वांदो पुमसे राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 मध्ये तृप्ती सिनलकर, नुपूर पावगे आणि समृद्धी कापसे यांनी 30 वर्षांखालील महिला सांघिक पुमसे गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावून आणखी एक राष्ट्रीय यश संपादन केले होते.

तृप्तीच्या या दुहेरी यशाबद्दल गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक, जागतिक तायक्वांदो महासंघ मान्यताप्राप्त प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र पोलीस तायक्वांदो संघाचे प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर, अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित तानाजी सिनलकर, सहाय्यक प्रशिक्षक प्रेम विलास पाटणे आणि महाराष्ट्र विशेषतः नवी मुंबई पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version