। रोहा । प्रतिनिधी ।
एक गाव एक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली संकल्पना गेली अनेक दशके प्रयत्नपूर्वक जतन करणार्या व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरलेल्या रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. शतकमहोत्सवी वर्ष संस्मरणीय व्हावे यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा ट्रस्टचा मानस होता. परंतु कोरोनासंबंधीचे प्रचलित नियम पाळणे देखील आपले कर्तव्य आहे असे समजून यावर्षी काही मोजके पण समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्याचे ट्रस्टतर्फे निश्चित करण्यात आले आहे.
सध्याच्या साथसंसर्ग काळात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट तर्फे भट सभागृहात जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या सहकार्याने शनिवार 18 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शंभराव्या वर्षानिमित्त शंभर बाटल्या रक्त संकलित करण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे अध्यक्ष राजेश काफरे यांनी सांगितले आहे.
रक्तदान शिबिराचे शंभर बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गावातील सर्व सेवाभावी संस्था, मित्र मंडळे, कॉर्पोरेट क्लब,व्यावसायिक मंडळे यांनी पुढाकार घ्यावा व हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.रक्तदान शिबिराबरोबरच रोह्यातील शंभर लोकांचे लसीकरण,श्री गणेश याग,भजने, इ. कार्यक्रम सर्व प्रचलित नियमांचे पालन करून आयोजित करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.







