आ. बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, आम्ही आमचे प्रयत्न सोडलेले नाहीत, असे प्रतिपादन महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनेचे टी.डी.एफ पुरस्कृत उमेदवार आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे. मुरुड येथील माळी समाजगृहात शिक्षक संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंगेश दांडेकर, अॅड. इस्माईल घोले, चेरमन फैरोज घलटे, चेअरमन मधुकर पाटील, अजित कासार, मनोज भगत, चेरमन इरफान हलडे, आशिष दिवेकर, विजय गिदी, शरद चवरकर, चेअरमन तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन देता येणार नाही असे सांगितल्यावर सर्व शिक्षक आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सरकारी अधिकारी यांनी जुनी पेन्शन देण्यासाठी दिलेली आकडेवारी कशी खोटी असून, प्रत्यक्षात राज्यातील लोकांना जुनी पेन्शन देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पावर येणार खर्च खूप कमी असणार आहे. यासाठी आमच्याकडे असणारी आकडेवारी त्यांना सुपूर्द केली आहे. त्यावेळी त्यांनी आम्हाला याबाबत विचारविनिमय करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.
आ. पाटील पुढे म्हणाले की, मागील वेळी मला सहकार्य करून आमदार म्हणून काम करण्याची संधी दिलीत. यावेळीसुद्धा मला संधी द्याल, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. आपल्या आमदारकीच्या कालावधीत विनाअनुदानित असणार्या शाळा अनुदानावर आणलेल्या आहेत. बहुसंख्य शाळांना 20 टक्के टप्पा वाढ मिळवून दिलेली आहे. 2005 पूर्वी सेवेत असणार्यांना लोकांना जुनी पेन्शन मिळवून दिली आहे. पुरवणी मागण्या मंजूर करून आर्थिक तरतूदसुद्धा करून घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शिक्षकांचे कोणतेही काम असो, त्यांनी माझ्याकडे द्यावे, ते काम तातडीने करून देण्याची माझी जबाबदारी राहणार असल्याचे आश्वासन यावेळी आ. पाटील यांनी दिले. यावेळी शिक्षकवृंदानी आपले प्रश्न उपस्थित केले, ते तातडीने मार्गी लावणार असल्याचे यावेळी आ. पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.