मुरुड तालुक्यात क्षयरोग मुक्त मोहिमेला सुरुवात

। कोर्लई । वार्ताहर ।

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच सन 2025 पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे. त्याचाच भाग मुरुड तालुक्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा शुभारंभ क्षयरोग पथक मुरुड तर्फे ग्रामीण रुग्णालय मुरुड, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रात करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय येथे प्रमुख पाहुणे डॉ.एम.ए.कोकाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड, सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

100 दिवसांच्या कालावधीत 60 वर्षांवरील सर्व लोकांची, बाधित, कर्करोग बाधित, डायबिटीस बाधित, धूम्रपान करणारे, दारूच्या आहारी गेलेल्या, वीटभट्टीवर काम करणार्‍या तसेच आश्रम गृहातील मुलांची 100 टक्के तपासणी करण्यात येणार आहे. तसेच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, समाजातील सर्व व्यक्तींनी या मोहिमेचा लाभ घेऊन तपासणी करून घेण्याचे आव्हान केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी उपस्थित सर्वांनी क्षयरोगाची लक्षणे, मोफत उपचार, निक्षयमित्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केेले.

Exit mobile version