चित्रा आस्वाद पाटील यांचा स्तुत्य उपक्रम, पाच हजारहून अधिक महिलांची उपस्थिती
। कुसुंबळे । वार्ताहर ।
अध्यक्षा चित्रा आस्वाद पाटील यांच्या झेप फाऊंडेशन तर्फे आयोजित नवेनगर पेझारी येथे ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ पाच हजारांहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून हळदी कुंकू समारंभाचा आस्वाद घेतला. सर्वप्रथम सुलभा काकू यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा आस्वाद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महिला आघाडी कोर कमिटी मेंबर यांच्या सहकार्याने तसेच चित्रा पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी व्यासपीठावर एकता नाचमंडळ मोठे शहापुर यांच्या नाच मंडळाने अतिशय सुंदररित्या पारंपारिक पद्धतीने नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रियाताई पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पंचायत समिती सदस्य रचना थोरे, सामाजिक कार्यकर्ता व युवा नेते निलेश थोरे, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, ताडवागळे उपसरपंच शैलेश पाटील, सुनील पिंगळे, जगदीश पाटील, संपदा म्हात्रे व सर्व महिला आघाडी प्रतिनिधी, ओजस पाटील, अर्णव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी महिला बचत गट, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या तसेच शेकापचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी मनोरंजनपर गाणी गायली तसेच सुवासिनींनी यावेळी उखाणे घेवून आपला आनंद साजरा केला. झेप फाउंडेशनने गेले 12 वर्षे पूर्वीपासून एकत्रितरित्या हळदीकुंकू साजरा करण्याची परंपरा अखंड सुरू ठेवली व चालू वर्षी देखील महिला वर्गात उत्सुकतेचा विषय असणारा हा हळदीकुंकू साजरा करण्यात आला व या उपक्रमात पाच हजाहून अधिक महिलांनी सहभाग घेवून आनंद साजरा केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिविता पाटील यांनी केले.







