| अलिबाग | प्रतिनिधी |
स्मार्ट मीटर सक्तीचे नाही असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, छुप्या पध्दतीने गाव पातळीवर मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. स्मार्ट मीटरची योजना अधोगती आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून महावितरण कंपनी खासगीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. हे मीटर बंद पडल्यास नागरिकांना साडेबारा हजार रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बंद करा, ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाची आहे. सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी कामगार पक्ष आता वेगळ्या भुमिकेने लढा देणार आहे. याबाबत तीव्र आंदोलन करून स्मार्ट मीटर बंद करण्यास सरकारला भाग पाडणार आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी मंगळवारी(दि.29)अलिबागमध्ये केले.
शेतकरी कामगार पक्ष अलिबाग कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आणि पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकरी भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शैला पाटील, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप अलिबाग तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप शहर प्रमुख अनिल चोपडा, ॲड. निलम हजारे, वृषाली ठोसर, ॲड. किशोर हजारे, अजय झुंजारराव, अशोक प्रधान, आदी मान्यवर पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शेतकरी कामगार पक्ष काम करीत आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या बैठकांमधून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत आहे. कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने सभा बैठकांत सामील होऊन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागला आहे.
शेतकरी कामगार पक्षाने अनेक संस्था उभ्या करून रोजगाराचे दालन खुले केले. मात्र, विरोधकांना साधी बालवाडीदेखील काढता आली नाही, ही मोठी चिंताजनक बाब आहे. परंतु, शेकापने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचे चित्र आहे. योग्य वेळ आल्यावर शेकाप त्यांची पाठ काढण्याचे काम नक्की करेल, असे मानसी म्हात्रे म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेची निवडणुक नाही. प्रशासकामार्फत कारभार चालत आहे. तरीदेखील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बसून न राहता, जनतेच्या हितासाठी काम करीत राहिले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धडपडत आहेत. सरकारने स्मार्ट मीटरची योजना आणली. साडेबारा हजार रुपयांचे मीटर मोफत बसविले जात आहे. या मीटरमुळे विज बील भरमसाठ येत आहे. मीटरची रक्कम यातूनच वसूल करण्याचा घाट आहे. त्यामुळे हे बदलण्याची गरज आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका येणार आहे. सर्व कार्यकर्ते महिलांनी ताकदीने या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. मोठ्या जिद्दीने प्रत्येकाने काम करायचे आहे. अलिबाग शहर हे उद्याचे एक मॉडेल ठरणार आहे. अलिबाग नगरपरिषद ही महाराष्ट्रातील मार्गदर्शक नगरपरिषद असणार आहे, असे मानसी म्हात्रे म्हणाल्या.






