पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?

नागरिकांकडून नाराजी; पाहणी व मदतकार्याची अपेक्षा

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून, घरांसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणे, नागरिकांना धीर देणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्याला गती देणे अपेक्षित असताना, पेणचे आमदार तसेच काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे इतर कार्यक्रम आणि बैठकींमध्ये व्यस्त असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संकटकाळात लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, नुकसानीचा आढावा घ्यावा आणि शासनाकडे तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, अपेक्षित प्रमाणात लोकप्रतिनिधी घटनास्थळी न दिसल्याने पूरग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version