भात खरेदी-विक्रीतून करोडो रूपयांची उलाढाल

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

कोकणात अनिश्‍चित पावसावर अवलंबून केल्या जाणार्‍या खरिपाच्या लागवडीत याही वर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली. लावणीच्या वेळी पावसाने मारलेली दांडी आणि कापणीच्या वेळी पडलेला अवकाळी पाऊस आदींमुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम अडचणीत आला होता; मात्र त्यातून सावरलेल्या शेतकर्‍यांना भात खरेदीच्या शासकीय दरामध्ये यावर्षी झालेल्या वाढीने हात दिला आहे. यावर्षी जिल्हा खरेदी-विक्री संघाकडे आजपर्यंत साडेआठ हजार क्विंटल भात विक्री केली. भात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून या वर्षी 2 कोटी 97 लाख 57 हजार रुपयांची उलाढाल झाली.

दरामध्ये यावर्षी झालेल्या वाढीचा फायदा उचलत रत्नागिरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरेदी-विक्री संघाकडे या वर्षी तब्बल 2 हजार 836 क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्रीतून यावर्षी 97 लाख 85 हजार 440 रुपयांची उलाढाल झाली. भात विक्री मोबदल्याची बहुतांश 95 टक्क्यांहून अधिक रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याने शेतकर्‍यांना हा मोबदला ताबडतोब मिळाला आहे.

Exit mobile version