तालुक्यातील भात खरेदी विक्री केंद्र बंद
व्यापार्यांच्या मनमानीमुळे आर्थिक नुकसान
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
‘ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’ ही म्हण सद्यःपरिस्थितीत शेतकर्यांसाठी इतिहासात जमा झाली असल्याचे दिसून येत आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणार्या शेतकर्याला आज मात्र अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून, तालुक्यातील शासनाची भात खरेदी केंद्रे बंद असल्याने नाईलाजाने बळीराजाला आपले भात व्यापार्याच्या दारात विक्रीसाठी न्यावे लागत आहे. व्यापार्यांच्या मनमानीनुसार भात खरेदी करण्यात येत आहे. उन्हाळी भातपीक जोरदार आले असूनसुद्धा भात खरेदी केंद्र बंद असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
देशात रायगडची नोंद भाताचे कोठार म्हणून इतिहास आहे; परंतु ती इतिहास जमा झाली की काय, त्यामुळे बळीराजा अक्षरशः या ना त्या कारणांनी आता मेटाकुटीला आला आहे. वाढती महागाई, बदलते हवामान, त्यात पीक कर्जाचा भार, अधिक मजुरी, महागडी अवजारे, बी-बियाणे, रासायनिक खतेदेखील महागली, शेतात धान्य पिकले; परंतु त्याला वेळेवर विक्री करू शकत नाही. रोहा तालुक्यातील भात खरेदी केंद्र बंद असल्याने उन्हाळी भात पीक घेतलेल्या शेतकर्यांनी आता कोणाची दारे थोटवायची? भात खरेदी केंद्र बंद असून, खासगी विक्रीत पुरेसा भाव मिळत नाही, तरीदेखील नाईलाजाने बळीराजाला खासगी व्यापार्यांच्या दारावर जाऊन विक्री करावी लागत आहे. त्यात अधिक वाहन खर्चाचा बोजा पडत आहे. त्यातच व्यापार्यांची मनमानी वेगळीच. धान्य काळे आहे, त्यात खडे आहेत, ते भिजले आहे असे या ना त्या कारणाचे बारा नमुने सांगत काट्यात घट, भाताला पुरेसा दर न देता मनमानीप्रमाणे शेतकर्यांवर अन्याय करत भात खरेदी करतात, यावर नियंत्रण कोणाचे? यात खांब नाक्यावरील व्यापारी मोठे माहीर असल्याचे शेतकर्यांतून बोलले जात आहे.
भात खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा – डॉ.मंगेश सानप
तालुक्यातील डोलवहाल सिंचनाखाली कोलाड खांब विभागातील वरसगाव, तिसे, चिंचवली, कोलाड, पुई, पुगाव, गोवे, मुठवली, शिरवली, खांब येथील अनेक शेतकरी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती लागवड करतात. आज त्यांचे पीकदेखील चांगले आहे. परंतु, पावसाळा डोक्यावर असताना भात खरेदी विक्री केंद्र सुरू नसल्याने येथील बळीराजाला नाईलाजाने खासगी व्यापार्यांच्या दारात नेऊन कमी दराने भात विक्री करावी लागत आहे. केंद्र बंद असल्याने त्याचा फायदा व्यापार्यांना होत असल्याने, भात खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे. तसेच व्यापार्यांच्या मनमानी कारभारावर संबंधित अधिकारी वर्गाने नियंत्रण ठेवून कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मंगेश सानप यांनी केली आहे.