एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हेळसांड
। मुंबई । वृतसंस्था ।
करोना प्रादुर्भावानंतर राज्यात पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. राज्यभरात 14 लाखापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले असून आजपासून परीक्षेला सुरुवात झालीय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झालीय. करोना प्रादुर्भावामुळे ज्या ठिकाणी शाळा त्याच ठिकाणी परीक्षा असे सूत्र शिक्षण मंडळाने ठरवले आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा यामागील उद्देश आहे. मात्र, राज्यातील काही ग्रामीण भागात प्रवासाची सुविधा नसल्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागले. एकीकडे करोना संसर्गाचा धोका असल्यामुळे करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान विद्यार्थांसमोर आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप असल्यामुळे परीक्षा केंद्रावर कसे पोहोचावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय.