। अलिबाग । सिद्धी भगत-पाटील ।
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे शाळा देखील बंद होत्या. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या होत्या. कोरोना आटोक्यात आल्यानंतर सध्या राज्यातील शाळा नियमितपणे सुरु झाल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानूसार गुरुवारी (दि.3) बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या तणावातून सानेगाव आश्रमशाळेतील प्रवेश प्रकाश बांगारे (वय 18) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागोठणेच्या सानेगाव परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रवेश प्रकाश बांगारे हा विद्यार्थी शिक्षणासाठी सानेगाव येथील आश्रमशाळेत वास्तव्य करीत होता. त्याचे पालक नागोठण्यातील पिंपळगाव परिसरात राहतात. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर प्रवेशने सानेगाव परिसरातील जंगल भागात गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एन.डी. ठाकूर अधिक तपास करीत आहेत.