। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे सेक्टर 21 परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला उलवे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 530 ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीतून मिळालेली दोन हजार रुपयांची रोकड, असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उलवे पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी सेक्टर 21 मधील गार्डनच्या कोपऱ्याजवळील रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सायंकाळी सातच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.
पोलीस व पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव इम्रान इम्तियाज शेख (32) रा. उलवे, मूळ रा. अमरोहा, उत्तर प्रदेश असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत 25 हजार रुपये किमतीचा 530 ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गांजा विक्रीतून मिळालेली दोन हजार रुपयांची रोकडही त्याच्याकडे सापडली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदर गांजा त्याला आसिफ मुस्तफा शेख रा. मोहा गाव याने विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गांजा आणि रोकड असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष सीलबंद करून जप्त केला. या प्रकरणी इम्रान इम्तियाज शेख आणि आसिफ मुस्तफा शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार बच्छाव करीत आहेत.
Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
