शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई | प्रतिनिधी |
कोकण आणि कोल्हापूर विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे यासाठी कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन सदर मागणी लावून धरली होती. पुढील अधिवेशनात या विषयाबाबत पुरवणी मागणी सादर करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते.
अखेर उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडलेली असून, कोल्हापूर आणि मुंबई विभागातील 1023 शिक्षक, शिक्षकेतर पदांना 20 टक्के अनुदान निधी मंजूर करण्यात आले आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, ज्यादा तुकड्या, अतिरिक्त शाखांतील 8820 शिक्षक, शिक्षकेतर पदांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मुंबई आणि कोल्हापूर विभागातील अनुदानापासून वंचित असणार्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना ही दिलासादायक बाब आहे. लवकरच सदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदांना अनुदान मिळून वीस टक्क्यानुसार वेतन सुरू होणार असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.
मुंबई आणि कोल्हापूर विभागातील उच्च माध्यमिक शाळेतील अनुदानापासून वंचित असणार्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अनुदान मिळवून दिल्याबद्दल कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचे आभार मानले.