| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत दाखल गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अग्निशस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कुळगाव पोलिसांनी बदलापूर-कान्होर मार्गावरील कान्होर गावाजवळील नाकाबंदी दरम्यान केली.
पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन संशयित अग्निशस्त्र घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आलोक रामानंद यादव (26) रा. उल्हासनगर-1 आणि नितीन युवराज अहिरे (28) रा. उल्हासनगर-1 यांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान आलोक यादव याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तर नितीन अहिरे याच्याकडून दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले.
याप्रकरणी सफौ. राजेंद्र बाबुराव ठाकणे यांच्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हे दोन्ही आरोपी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणात सुमारे तीन वर्षांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते आणि कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम व त्यांच्या पथकाने केली.
Mcoca Arrest: मोक्कामधील दोन फरार आरोपी जेरबंद
