सुकेळी येथे दोन अपघात, पाचजण गंभीर जखमी

| सुकेळी | वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी (दि. १४) सकाळी सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झाले. सॅन्ट्रो गाडी व वॅगनर यांच्यात एक अपघात तर कॅप्सुल टॅंकरचा पलटी होऊन दुसरा अपघात घडला. दोन्ही अपघात सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास घडले.



या अपघातासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबई बाजुकडुन महाडकडे जाणारी वॅगनर गाडी क्रं. एम. एच. ०४ एच.एम. ३४२२ ही गाडी सुकेळी येथिल जिंदाल गेटच्या समोर असलेल्या गतिरोधकाजवळ आली असता वॅगनर गाडी चालकाने ब्रेक मारल्यानंतर मागुन भरधाव असलेल्या सॅन्ट्रो गाडी क्रं. एम.एच. ०४ इ.एक्स. ६५२४ या गाडीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सरळ जाऊन वॅगनर गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये सॅन्ट्रो गाडीतील शर्मिला शाम यादव (वय- ५०) , मनिषा सुनिल लुष्टे (वय- ४१), कुणाल सुनिल लुष्टे (वय- २१), तर तेजस सुनिल लुष्टे (वय- १९) हे चौघेजण गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांच्यावर जवळच असलेल्या जिंदाल रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी पुढे पाठवण्यात आले.

तर दुसरा अपघात हा सुकेळी खिंडीमध्ये घडला. यामध्ये कॅप्सुल टॅंकर क्रं. एम.एच.४६ एच- ४७७३ हा गोवा बाजुकडून मुंबईच्या दिशेकडे जात असतांना गाडीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे टॅंकर रस्त्यावरुन दुस-या बाजूला खाली असलेल्या रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. सुदैवाने हा टॅंकर रिकामा होता. त्यामुळे जिवीतहानी टळली. यामध्ये चालक इशाद अहमद (वय-३३) हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नागोठणे येथिल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे महाडच्या दिशेने जाणा-या गाड्याची संख्या भरपुर होती. तसेच पुढे लगातार चार दिवस सुट्टया असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच या टॅंकर अपघातामुळे गोवा बाजुकडे जाणारा  रस्ता बंद करण्यात आल्यामुळे थोडा वेळ वाहतुक कोंडी झाली होती. परंतु महामार्गावरील ऐनघर पोलिस चौकिचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम भोईर यांनी स्वतः तसेच त्यांच्या कर्मचा-यांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी मोळाचे सहकार्य केले. या दोन्हीही अपघातांचा तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version