जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक

बारा गुन्ह्यांची उकल

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

कक्ष तीन गुन्हे शाखेकडून घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींकडून बारा गुन्ह्यांची उकल करून गुन्हयातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू असा एकूण बारा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 20 जुलै रोजी अज्ञात इस्मानी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकूण सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष तीनने गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच बातमीदारांकडून माहिती प्राप्त केली. तांत्रिक तपासा आधारे आरोपी हैदर अनारूल शेख व युसूफ नूर इस्लाम शेख यांना त्यांच्या गावी मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वेने पळून जाण्याचा प्रयत्न करताना वर्धा रेल्वे स्टेशन येथे गीतांजली एक्सप्रेस मधून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी नवी मुंबई व रेल्वे आयुक्तालय मुंबई मधील घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. आरोपींकडून सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातील चार, सानपाडा तुर्भे पोलीस ठाण्यातील एक, कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील दोन, पनवेल शहर पोलीस ठाण्यातील एक, एन आरआय सागरी पोलीस ठाण्यातील एक, रबाळे पोलीस ठाण्यातील दोन आणि वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यातील एक असे 12 गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

अटक आरोपी हैदर शेख याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. तर युसुफ नूर इस्लाम शेख याच्यावर यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अनिल देवळे, सपोनी ईशान खरोटे व त्यांच्या पथकाने केली.

Exit mobile version