घरफोडी करणारे दोन आरोपीं जेरबंद ; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

रोहा, अलिबाग, रसायनीतील गुन्हे उघडकीस

। अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।

घरफोडी करणार्‍या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. विविध गुन्ह्यात हव्या असलेल्या या गुन्हेगारांकडून पाच लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी अलिबाग तसेच रसायनी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडया केल्याचे उघडकीस आले आहे.

नवनाथ साहेबराव गोरडे वय 34 वर्षे रा. पोहेगाव, कोपरगाव जवळ, शिर्डी, जि. अहमदनगर, तसेच अतुल चंद्रकांत आमले, वय – 29 वर्षे, रा. ठी. आकाशनगर, कर्वेरोड, पुणे अशी या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींविरोधात रोहा पोलीस ठाण्यात दि. 20 जानेवारी रोजी दाखल असलेल्या भादविक 454, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोउनि साठे व टिम यांचेकडून चालू होता.

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक साठे आणि पथकाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने आरोपींचे फोटो निष्पन्न करून सदर आरोपीत हे शिर्डी व पुणे येथील राहणारे असल्याचे माहिती काढली. सदर आरोपीतांना शिर्डी व पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी रोह्यासह अलिबाग व रसायनी पोलीस ठाण्याचे अंतर्गत देखील घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली दिली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 84 ग्रॅम वजनाचे दागिने, 10 हजार रुपये किंमतीचेे चांदीचे दागिने , 50 हजार रुपये रोख रक्कम, गुन्हा करताना वापरलेली 50 हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल असा एकूण 5 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

यातील नवनाथ गोरडे याच्यावर यापूर्वीचे सदोष मनुष्यवध, दरोडा, शस्त्र अधिनियम अन्वये एकूण 09 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अतुल आमले याच्यावर दरोडा, चोरी, घरफोडीचे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, नाईक अक्षय जाधव, पोलिस शिपाई अक्षय सावंत, तसेच सायबर विभागाचे पोलिस हवालदार तुषार घरत व पोलिस शिपाई अक्षय पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version