रोहा, माणगाव, पाली, पेण, वडखळ मध्ये केल्या होत्या सहा चोर्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात मोठया प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या होत्या. यापैकी तब्बल सहा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील चोरटयाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.
अंकेश पांडुरंग पाडावे, रा. कांदळवाडा, ता. म्हसळा असे या चोरटयाचे नाव आहे. रोहा पोलिस ठाणे हद्दीतील दोन तसेच माणगाव, पाली, पेण, वडखळ मध्ये सहा चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपास करीत होते. सदर तपास करत असताना संशयावरुन अंकेश पाडावे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस उपनिरीक्षक वायंगणकर, पोलिस हवालदार धायगुडे, पोलिस नाईक शिरसाट यांनी ताब्यात घेतले. त्याने चौकशीत रोहा पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे आपणच केले असल्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीत रोह्यासह माणगाव, पाली, पेण, वडखळ या पोलिस ठाणे हद्दीत झालेले गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. या आरोपीकडून 90 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, यांच्यासह पोलिस हवालदार चव्हाण, खैरनार, पोलिस नाईक जाधव, खराटे, पोलिस शिपाई सावंत, रोहा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वायंगणकर, पोलिस हवालदार धायगुडे, पोलिस नाईक शिरसाट आदींचा सहभाग होता.