दोघे गंभीर जखमी
। पुणे । प्रतिनिधी ।
बारामती-भिगवन मार्गावर कार भीषण अपघात झाला. या अपघातात वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
ही दुर्घटना बारामती-भिगवन मार्गावरील लामजेवाडी गावाजवळ पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. बारामती येथील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतील चार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बारामतीहून भिगवनकडे टाटा कारमधून निघाले होते. दरम्यान, वळणावर आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या भीषण अपघातात दक्षु शर्मा (रा. दिल्ली) व आदित्य कणसे (रा. मुंबई) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, चेष्टा बिश्नोई आणि कृष्णासून सिंग हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पथक, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी हजार झाले. त्यांनी जखमींना तात्काळ भिगवण येथील रुग्णालयात दाखल केले.