14 म्हैशी 5 गाईंसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
| नागोठणे | वार्ताहर |
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरे चोरणार्या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस मांडलेला असतानाच नागोठणे पोलिसांनी दोन दिवसात दोन वाहनांवर कारवाई करीत जनावरांची वाहतूक करणार्या दोघांसह एक आयशर टेम्पो एक पिकअप जीपसह चोरीच्या 14 म्हैशी व 5 गाईंसह एक बैल जप्त केला आहे.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार 28 जून रोजी मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील कामत हॉटेल जवळ संदीप महिपाल पाल ( 41) रा. कर्चलपुर, पो. बिजावली, ता. औंध, जि. फतेहपुर (उत्तर प्रदेश) सध्या रा. विरार रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे हा पिकअप जीप मध्ये 5 गाय व 1 वासरू यांना दाटीवाटीने भरून त्यांना कोणताही चारा अगर पाण्याची व्यवस्था न करता निर्दय व क्रूरपणे वाहतूक करीत होता. त्यातील एक गाय पिकअप जीपच्या खाली पडून जखमी झाली. काही दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संदीप महिपाल याच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा एका प्रकरणात 29 जून रोजी नागोठणे जवळील मिरानगर भागात आरोपी अक्रम अब्दुलगणी सय्यद ( 42 ) गोवंडी-मुंबई, हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो मध्ये 14 म्हैशी दाटीवाटीने भरून त्यांना कोणताही चारा अगर पाणी याची व्यवस्था न करता निर्दयी व कृरपणे टेम्पो मधून वाहतूक करीत असताना नगोठणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही घटनांचा तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश लांगी हे करीत आहेत. या दोन घटनांमध्ये सुमारे 19 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान गुरेमालक आपली गुरे मोकाट सोडत असल्यानेच गुरे चोराचे फावत आहे. त्यामुळेच गुरे चोरांच्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या असल्याने गुरे मालकांनी आपल्या गुरांची काळजी घेतानाच आपली गुरे मोकाट सोडू नयेत. असे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आले आहे.