| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी पनवेल न्यायालयातील बनावट मायनर दाखला प्रकरणात वकिला पाठोपाठ आणखी दोघांना मुंबईतून अटक केली. या दोघांनी वकिलाला न्यायालयाचे बनावट शिक्के बनवून दिल्याचे उघडकीस आले. मोहम्मद सलीम इलीयाज शेख (42) रा. भेंडी बाजार, व मोहम्मद मुमताज मकबुल हुसेन (32) रा. धारावी अशी या दोघांची नावे असून, न्यायालयाने या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
वाशीत बांधकाम व्यावसायिक लाधवजी पटेल (57) यांना उलवे, सेक्टर-17 मधील जमीन खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी न्यायालयातून मायनर दाखला घेणे आवश्यक होते. यासाठी पटेल यांनी न्यायालयात अर्ज देखील दाखल केला होता, मात्र प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याने ओवळे येथे राहणाऱ्या सागर घरत याने एका वकिलामार्फत लवकरात लवकर मायनर सर्टिफिकेट तयार करून 10 सप्टेंबर रोजी पटेल यांना न्यायालयीन आदेशाची प्रत दिली होती. मात्र, पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. ई. कोठळीकर यांची सही व शिक्का असलेल्या या दाखल्याची पनवेल न्यायालयात पडताळणी केली असता, हा दाखला बोगस असल्याचे उघड झाले. त्यानंतर पटेल यांनी आपल्या वकिलामार्फत सागर घरत याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याने ही प्रत खारघर येथील ॲड. व्ही. के. शर्मा यांनी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी ॲड. व्ही. के. शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ॲड. व्ही. के. शर्मा याने मोहम्मद सलीम इलीयाज शेख व मोहम्मद मुमताज मकबुल हुसेन या दोघांकडून न्यायालयाचे बनावट शिक्के बनवून घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या दोघांना अटक केली. या दोघांनी एका अपंग व्यक्तीकडून शिक्के बनवून घेतल्याचे आढळले असून, त्याला देखील नोटीस बजावण्यात आल्याची माहिती स.पो.नि. सचिन पोवार यांनी दिली.







