| राजापूर | प्रतिनिधी |
राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलालगत जंगलमय भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणार्या दोघांना बंदुकीसह नाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सिंगल बॅरल बंदूक, दोन जिवंत काडतुसांसह सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला सकाळी 6.15 वाजता दर्शन दशरथ तांबे (22) आणि प्रशांत सहदेव धरमकर (36) हे दोघे दांडे अणसुरे पुलाच्या पुढे जंगलमय भागात शिकार करण्याच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक, दोन जिवंत काडतुसांसह आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी दोघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी 50 हजार रुपयांची सिंगल लोखंडी बॅरल 12 बोअर बंदूक, दोन शक्तीमान एक्स्प्रेस 12 या कंपनीची जिवंत काडतुसे, मोबाईल, लोखंडी बॅटरी, हेडटॉर्च असे एकूण 60 हजार 350 रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली असून, नाटे पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.