रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गांजाची तस्करी करणार्या वाहनांवर रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडून 1 कोटी 13 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या गांजाचा समावेश आहे. ही कारवाई पनवेल-मुंब्रा महामार्गावरील तळोजा येथे बुधवारी (दि.13) करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पनवेल-मुंब्रा महामार्गावरू एका महींद्रा कंपनीच्या गाडीतून अंमली पदार्थाच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रदिप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगडचे अधीक्षक रविंद्र कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. निरीक्षक आर.डी. पाटणे, उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी.सी. लाडके, एन.जी. निकम, प्रवीण माने, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. काबंळे, निशा ठाकूर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम या पथकाने बुधवारी सापळा रचला. त्यानुसार गाडी अडवून तपासणी केली असता, गाडीमध्ये 1 कोटी रुपयांचा गांजा आढळून आला. यामध्ये चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरिफ शेख (25) व परवेझ शेख (29) असे या दोघांची नावे आहेत. त्यांना शनिवारपर्यंत (दि.15) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती अधीक्षक रविंद्र कोले यांनी दिली.