मुरुड पोलिसांची समुद्रात मोठी कारवाई; मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पोलीस ठाणे व आगरदांडा नौका तळाच्या अधिकारी-अंमलदारांनी समुद्रात रात्री गस्त घालत असताना एलईडी दिव्यांच्या सहाय्याने बेकायदा मासेमारी करणाऱ्या दोन बोटी पकडून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही बोटी आगरदांडा नौका विभाग येथे जप्त ठेवण्यात आल्या आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाई पथकात परशुराम ह. कांबळे (पोलीस निरीक्षक, मुरुड), आर.बी. रसेडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), साईनाथ गोविंद दळवी (पोलीस उपनिरीक्षक, नौका विभाग, आगरदांडा), किरप्पा दत्तात्रेय गायकवाड, नागेश मारुती भवर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) आणि अक्षय परंडवाल (पोलीस शिपाई) यांचा सहभाग होता.
दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री 9.45 वाजल्यापासून ते दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत ‘सावित्री’ या शासकीय बोटीने समुद्रात गस्त घालत असताना मुरुड समुद्रातील नानवेल दीपगृह परिसरात अंदाजे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर दोन बोटी संशयास्पदरित्या मासेमारी करताना आढळल्या. तपासणी केली असता त्या एलईडी उपकरणांच्या सहाय्याने बेकायदा मासेमारी करत असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ दोन्ही बोटी ताब्यात घेऊन आगरदांडा नौका विभाग येथे आणून जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या बोटींपैकी ‘धनलक्ष्मी’ या बोटीचा क्रमांक आय.एन.डी.एम.एच.03एम.एम.4094 असून, त्यामध्ये बाहेरील 10 एलईडी दिवे, पाण्याखालील 2 एलईडी दिवे व 1 जनित्र आढळून आले. तसेच ‘वैष्णवी’ या बोटीचा क्रमांक आय.एन.डी.एम.एच.03एम.एम. 4197 असून, त्यामध्ये बाहेरील 8 एलईडी दिवे, पाण्याखालील 2 एलईडी दिवे व 1 जनित्र जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान मन्सुर हम्मीद सोलकर (36, रा. भरडखोल, ता. श्रीवर्धन), वैष्णव उद्धव वाघे (22), प्रमोद माया चौलकर (41, रा. श्रीवर्धन कोळीवाडा) आणि चंद्रकांत बाळाराम पाटील (60, रा. जीवनाबंदर, ता. श्रीवर्धन) हे इसम आढळून आले.
समुद्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणे बेकायदा असून, समुद्री जैवसंपत्तीला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, समुद्रात कोणीही इसम बेकायदा मासेमारी करताना आढळल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे किंवा नौका विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






