घरफोडी करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

घरात घुसून घरफोडी करणाऱ्या दोघांना अलिबाग न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या निर्णयाने घरफोडी करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. या खटल्याची सुनावणी गुरुवारी (दि.23) अलिबागमधील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप निषाद असे या आरोपीचे नाव आहे. हा मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील असून, तो नवगाव येथे सध्या राहात होता. तसेच संगिता काजले असे या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. ही महिला आरोपी अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रहिवासी आहे.

अलिबाग तालुक्यातील चोंढी नाकामधील वेलणकर वाडी येथील ऋषीकेश वेलणकर हे व त्यांच्या घरातील मंडळी स्वतःच्या घरात झोपलेले असताना त्यांच्या घराच्या मागील दक्षिणेकडील लोखंडी दरवाज्याची कडी काढून व आतील लाकडी दरवाजा ढकलून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे वरील वर्णानाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे.आर. पाटील यांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी अलिबागमधील न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. फिर्यादीसह मिळालेले साक्षीदार व पोलिसांचा तपास, याबाबत मिळालेले पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

Exit mobile version