। माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरान घाटातील अपघाताची मालिका सुरूच आहे. अशातच शनिवारी (दि. 19) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घाटातील नागखिंडीत इनोव्हा कार आणि इको कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात इको कारचालक हेमंत जाधव उर्फ हारबो हा जखमी झाला आहे. तर इनोव्हा कारमधील पर्यटक जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेरळ येथील इको कारचालक हेमंत जाधव हा माथेरानला जाण्यासाठी घाट चढत होता. दरम्यान बदलापूर येथील राहणारे पर्यटक क्रिश पटेल हे आपल्या कुटुंबासोबत इनोव्हा कारमधून माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. ते माथेरान येथून दुपारी तीन वाजताच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले असताना घाट उतरत असताना इनाव्हा कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार समोरून येणाऱ्या इको कारला धडकली. यामध्ये इको कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, त्याच्या डोळ्याच्या समोर दुखापत झाली आहे. तर इनोव्हा कारमध्ये सात प्रवासी होते. यामध्ये काहींना जबर मार लागला असून ते जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना नेरळ खांडा येथील डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी हजर झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.






