दोन कोटींचा पुल खड्ड्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेला लहान पूल जून 2025 मध्ये वाहतुकीस बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून बांधण्यात आलेल्या पुलावरून दि.4 ऑगस्ट रोजी वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, या पुलावर दोन्ही बाजूला टाकण्यात आलेली खडी दबून गेली असून, खड्डे पडले आहेत. त्यामुळे दोन कोटी खर्चून बांधलेल्या पुलाचे काम तकलादू असल्याचे बोलले जात आहे.

नेरळ येथील मोहाची वाडी आणि वाल्मिकी नगर समोरील लहान पूल नादुरुस्त झाल्याने जून 2025 पासून वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम मंजूर होण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी जुना पूल तोडून दोन महिने कोणतेही काम बांधकाम विभागाने नेमलेला ठेकेदार करीत नव्हता.त्यावेळी जनमताचा रेटा प्रचंड वाढला आणि त्यावेळी ठेकेदाराने पुलाच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर हा पूल ऑगस्ट पहिल्या आठवड्यात खुला केला, परंतु, ठेकेदाराची सार्वजनिक बांधकाम खात्यावर असलेली लॉबिंग यामुळे दोन कोटी खर्चून बांधलेला पूल अवघ्या आठ दिवसाच्या आत खड्डेमय बनला आहे. स्थानिक आमदारांनी पुलाची पाहणी करावी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चौकशीची मागणी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Exit mobile version