दोन दिवस तापमानाचा कहर

यलो अलर्टचा इशारा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मे महिन्याची सुरुवात होताच उन्हाने जोरदार तडाखा देण्यास सुरुवात केली असून, नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता अधिक वाढणार असून, बुधवार (दि. 6) आणि गुरुवार (दि. 7) या कालावधीत तापमानाचा पारा चांगलाच चढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे कठीण झाले असून, उन्हाचा चटका असह्य होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी काही जण मफलर, तर काही स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. शरीरात गारवा टिकवण्यासाठी नारळ पाणी तसेच इतर थंड पेयांकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, 6 आणि 7 मे या दोन दिवसांसाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, हलक्या व सूती कपड्यांचा वापर करावा, तसेच वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात उपचार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पाच, काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी दोन खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version