। पुणे । प्रतिनिधी ।
कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवर पिंपळनेरजवळ असलेल्या कालव्यात कार कोसळली. या अपघातात इंदापूरमधील वडापुरी येथील शंकर उत्तम बंडगर व अनिल हनुमंत जगताप (तोबरे) या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.21) घडला.
मिळलेल्या माहितीनुसार, वडापुरी येथील सुरेश राजाराम जाधव (49) हे त्यांच्या गावातील शंकर उत्तम बंडगर (44) व अनिल हनुमंत जगताप (55) यांच्यासह कारने धाराशीव येथून वडापुरीकडे परतत हाेते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावर पिंपळनेरजवळ आले असता चालक बंडगर यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार लगतच्या असलेल्या कॅनॉलला लावलेल्या लोखंडी गार्डला घासून कालव्यामध्ये पडली. त्यावेळी सुरेश जाधव हे गाडीचा साईडचा दरवाजा उघडून गाडीतून कसेबसे बाहेर आले. मात्र, यावेळी गाडीचे इतर दरवाजे लॉक झाल्याने इतर दोघांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने कार ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गाडीत असलेले शंकर बंडगर आणि अनिल जगताप यांना उपचारासाठी कुर्डूवाडी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




