| साक्री | वृत्तसंस्था |
साक्री येथील केटीवेअर बंधार्यात बुडून दोन शालेय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यातील एकाची ओळख पटली आहे. त्याबाबत साक्री पोलिस ठाण्यात रविवारी (दि.20) अपहरणाची नोंद झाली होती. दुसर्या मुलाचा सोमवारी दुपारी उशिरापर्यंत शोध सुरू होता. साक्री शहरातील सिद्धेश राकेश पाटील (16) व तनय प्रशांत खैरनार (15), दोघे रा. गोपाळनगर, साक्री यांना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, दोघे कुठेही आढळले नाहीत. त्यावरून प्रशांत संपत खैरनार यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. एका शेतकर्याला केटीवेअर बंधार्याजवळ सोमवारी सकाळी पाण्यात शालेय मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. तसेच, दोन विद्यार्थ्यांचे कपडे व चपला केटीवेअरच्या बाजूला आढळले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आल्यावर पाण्यात तरंगणार्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे नाव सिद्धेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुसर्या विद्यार्थ्याचा शोध न लागल्याने त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. साक्री पोलिसांनी सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविला.