। धुळे । प्रतिनिधी ।
धुळे शहरातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी पैसा हवा म्हणून महापालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. धुळे शहरातील बहुसंख्य मालमत्ताधारकांकडे शंभर कोटींच्या आसपास रक्कम थकली आहे. प्रयत्न करूनही प्रशासनाला वीस कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल करता आलेली नाही. त्यामुळे आता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून पैशांची मागणी केली जात आहे.
धुळे महापालिकेचे कार्यक्षेत्र वाढले असून आजूबाजूची दहा गावे महापालिकेच्या हद्दीत आली आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या उपनगरांमधील नागरिकांना रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधांविषयी अपेक्षाही वाढल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत मूलभूत सुविधा देण्यासाठी पैसे नसल्याने प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न केले. अनेकदा नोटीस बजावूनदेखील थकबाकीदार पैसे देत नसल्याने प्रशासन आक्रमक झाले आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आता ढोल-ताशा वाजविले जात आहेत.
धुळे शहरासह पूर्वेकडील बाळापूरलगतच्या अनेक थकबाकीदारांकडे गेल्या दोन दिवसांत महापालिकेत ढोल-ताशा बडवून पैशांची मागणी केली. मात्र, ढोल-ताशा वाजवल्यानंतरदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने पथकाकडून काही मालमत्ता सीलबंद केल्या जात आहेत.