। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे वसाहतीत सेक्टर 23 येथे असलेल्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात भंगारची गोदाम थाटण्यात आली आहेत. रविवारी (दि. 23) रात्री बाराच्या सुमारास अशाच एका गोदामात आग लागली. पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात त्यांना यश आले.
बेकायदेशीरपणे थाटण्यात येणाऱ्या भंगार साठवण्याच्या गोदामांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, घटनेनंतर गोदामात आग विजवण्याची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे लक्षात येत असते. आशा वेळी अनधिकृतपणे भंगार साठवण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र, हे होत नसल्याने भंगार व्यवसायिकांचे फावले असून, वसाहतीलगतचे मोकळे भूखंड हेरून त्या ठिकाणी गोदाम थाटण्याचा सपाटा व्यवसायिकानी लावला आहे. कामोठे वसाहतदेखील याला अपवाद नसून, वसाहतीलगत असलेल्या जवाहर औद्योगिक वसाहती शेजारील मोकळ्या भूखंडावर भंगार व्यवसायकांनी आपले सम्राज्य निर्माण केले आहे.
मोठी दुर्घटना टळली
ज्या ठिकाणी आगीची घटना घडली त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा साठा करणारे गोदाम आहे. त्याचप्रमाणे परिसरात अनेक भंगार गोदाम तसेच, रसायनिक कारखाने आहेत. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी वेळीच पोहचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.