| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत जवळील खांडपे येथे असलेल्या रेडीसन ब्लू हॉटेल मधील दोन कामगारांचा बुडून मृत्यू झाला आहे. या हॉटेलच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदिमधील बंधाऱ्यात पोहत असताना त्या दोन कामगारांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खांडपे गावाजवळील रेडीसन ब्लू हॉटेल मधील दोन कामगार आपले काम उरकून पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. या हॉटेलच्या बाजूने उल्हास नदी वाहत असून, या नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडते आणि त्यामुळे या नदीमध्ये पाणी साठा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यात पाणी साठा मोठ्या प्रमाणात असून, त्या पाण्यात पोहण्यासाठी विवेक सिंग रावत आणि रूपेन सुब्बा हे दोघे गेले होते. कर्जत खांडपे कोंडीवडे रस्त्याला लागून असलेल्या नदी मध्ये हे तरुण पोहण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी तेथे असलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती कर्जत पोलीस ठाणे यांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने उल्हास नदी मधून त्या दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी खोपोली येथून अपघातग्रस्त टीम यांना पाचारण केले. गुरुनाथ साठलेकर यांच्या टीम ने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आणि तब्बल सहा तासांनी या दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.