। नाशिक । प्रतिनिधी ।
पुणे-इंदूर महामार्गावर भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 फूट खोल विहिरीत पडला. या अपघातात ट्रकचालकासह क्लिनरचा मृत्यू झाला.
पुणे-इंदूर महामार्गावर मनमाड शहरानजीक असलेल्या कुंदलगावजवळ हा अपघात झाला. घटनेतील ट्रक हा मालेगावकडून पुणेमार्गे तामिळनाडूकडे जात होता. दरम्यान पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 फूट खोल विहिरीत पडला. या भीषण अपघातात ट्रकचालक आर मुगम आणि क्लिनर सतीश कुमार या दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून ट्रक बाहेर काढला. तसेच दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.