| पनवेल | वार्ताहर |
शहरातील फॉरेस्ट कॉलनी परिसरात एलएसडी पेपर या अमली पदार्थाची विक्रीसाठी आलेल्या व त्याला पुरवठा करणाऱ्यास अशा दोन तरुणांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. ओंकार खुटले (23) व ललित पवार (24) अशी त्यांची नावे असून अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचे 1.32 ग्रॅम वजनाचे 53 एलएसडी पेपर जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी चार लाखांची कार व मोबाईलही हस्तगत केले आहे.
पनवेलमधील फॉरेस्ट कॉलनी परिसरात एक तरुण अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने पनवेलमधील सम्राट हॉटेल व परिसरात सापळा लावला. यावेळी एका कारमधून ओंकार खुटले हा तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड करून झडती घेतली असता, त्याच्याजवळील पिशवीमध्ये सुमारे 8 लाख रुपये किमतीचे 53 एलएसडी पेपर आढळले. अमली पदार्थ विरोधी पथकाने खुटलेकडे सापडलेले एलएसडी पेपर जप्त करून चौकशी केली असता केली असता, त्याने बालाजी आंगन सोसायटीत राहणाऱ्या ललित पवार याच्याकडून ते घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने ललित पवारला ताब्यात घेतले. दोघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.