| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
विजेच्या धक्याने महावितरण विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरात असलेल्या ला रिव्हेरिया या रहिवासी संस्था परिसरात घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरत ला रिव्हेरिया नावाची रहिवासी संस्था आहे. या परिसरातील वीज पुरवठा काही दिवसांपासून खंडित होत असल्याने महावितरण विभागाकडून या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते.
सोमवारी (दि.31) या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत विजेचा धक्का लागल्याने महवितरण विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.