खांब-रोह । वार्ताहर ।
पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालिकांना चावा घेतल्याची घटना रोहे तालुक्यातील धानकान्हे या गावी घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील सचिन जाधव यांची बालिका संस्कृती जाधव (वय 5 वर्षे) अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर एकाकी तिच्या हातवर हल्ला केल्याने या हल्ल्यात ती जबर जखमी झाली. तर जाधव यांच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणर्या राकेश कचरे यांची लहान बालिका निधी कचरे हिच्यावरही एकाकी हल्ला करून तिलाही जखमी केले.
पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालिकांना जबर जखमी केल्याने धानकान्हे येथे कुत्र्याच्या या हल्ल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. तर जखमी झालेल्या या दोन्ही बालिकांना रोहे शासकीय रूग्णालयात उपचार होऊ न शकल्याने त्यांना अलिबाग येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.