रोहा तालुक्यात दोन घरांना आग

तामसोलीमधील घटना लाखोंचे नुकसान
| सुकेळी | वार्ताहर |

नागोठण्याजवळच असलेल्या तामसोली येथे लागलेल्या आगीमध्ये दोन घरे जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने दैव बल्लतर म्हणूनन यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नक्की कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्यापही समजले नाही. ही घटना शनिवार (दि.14) रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.


तामसोलीतील दशरथ गजानन गायकवाड यांच्या घराला रात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे प्रथमतः ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश डोबले यांच्या लक्षात येताच त्यांनी यांची माहिती गायकवाड कुटुंबियांना तसेच पोलिस पाटील महेश शिरसे यांना दिली. परंतु काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण करीत बाजूला असलेल्या नीता नारायण गायकवाड यांच्या घराला देखील आगीने वेढा घातला. या दोन्ही घरामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडे असल्यामुळे आग ही वार्‍यासारखी पसरली. सुदैवाने या घरातील दोन्हीही कुटुंबे कामानिमित्ताने शहरामध्ये राहत असल्यामुळे एका घराला लॉक होते. तर दुसर्‍या घरातील कुटुंब हे शेजारीच असलेल्या लग्नकार्यासाठी दोन दिवसांपूर्र्वी नुकतेच गावी आले होते. पंरतु ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या घरातील कुटुंब लग्नकार्य असलेल्या ठिकाणी गेल्यामुळे होणारी जीवितहानी ही टळली. मात्र या घटनेमध्ये दोन्ही घरे जऴून पूर्णपणे खाक झाली असुन लाखोंचे नुकसान झाले आहे.तसेच शेजारीच असलेल्या सदानंद शिवराम चव्हाण यांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


आग लागल्याचे समजताच तामसोली गावातील ग्रामस्थ तसेच तरुणांनी पाणी ओतून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पंरतु आग आटोक्यात येत असतांनाच पुन्हा एकदा आगीने रौद्ररूप धारण केल्याने जिंदाल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

Exit mobile version