पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकाच पत्त्यावर 268 मतदार

अरविंद म्हात्रे यांची चौकशीची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागांतील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावे समाविष्ट झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत आहेत. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासनियता धोक्यात येत असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ही बोगस नावे तातडीने तपासून मतदार यादीमधून वगळण्यात यावी. याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष टाकून ज्या ज्या प्रभागांमधून तक्रारी आलेल्या आहेत त्यांची शहानिशा करून ती नावे वगळण्यात यावी, जेणेकरून पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही पारदर्शकपणे पार पाडता येईल, असे मत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले की, महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये जवळजवळ 2000 मतदान बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्यामधून 268 मतदार हे एकाच वडिलांच्या नावाने तेही एकाच घरात दर्शवले आहेत. महत्वाचे म्हणजे ते घर सुद्धा उपस्थित नाही. तसेच, कल्याण पूर्व मधील मतदारांची प्रभाग क्रमांक 2 मध्ये नोंद केलेली आहे. अशा प्रकारे बोगस मतदान प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात केले आहेत. त्याची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मतदान कमी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे कळवा. त्याप्रमाणे मी स्वतः निवडणूक अधिकारी यांना ई-मेल केलेला आहे आणि सविस्तर पीडीएफ सुद्धा पाठवलेल्या आहे. जर निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीमध्ये बदल केला नाही तर मी स्वतः न्यायालयात या विषयावरती जाणार आहे.

Exit mobile version