| अलिबाग | वार्ताहर |
श्रीवर्धन-म्हसळा रस्त्यावर बुधवारी रात्री दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना आराठीनजीक घडली असून, एका दुचाकी चालकाविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील फिर्यादी हा त्याची दुचाकी घेऊन त्यांच्या मित्रासमवेत भोस्ते गावाकडे जात होता. म्हसळा-श्रीवर्धन मार्गावरून जात असताना रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक लागली. या धडकेत दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले असून, दोघेजण जखमी झाले. वाहन चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवत गुन्हा दाखल केला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम करीत आहेत.