रक्षाबंधनाला कुटुंबावर काळाची झडप

। पालघर । प्रतिनिधी ।

पालघर-माहीम रस्त्यावर मंगलम रिसॉर्ट येथे एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणार्‍या चारचाकी वाहनाला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिनेश पाटील आणि दहा वर्षीय दक्ष गावड या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन जखमी झाले आहेत.

नालासोपार्‍यातील रहिवाशी रूपेश गावड यांची पत्नी हृषाली गावड हि दोन मुलांसह तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी सफाळेवरून कोरे येथे गेली होती. हृषालीने भावाला राखी बांधून ती बहिणीचे पती दिनेश पाटील यांच्या दुचाकीवर बसून पालघरकडे येत होती. यावेळी माहीमजवळील मंगलम हॉटेलजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार दिनेश समोर येणार्‍या कारला धडकला. ही धडक इतकी भयानक होती की, चारचाकी वाहनाची एअर बॅग ओपन झाली. या अपघातात दक्ष गावड याचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकी चालविणारे दिनेश पाटील याचाही खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेली हृषाली आणि मुलगी श्रावणी (15) हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणात सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव हे करीत आहे.

Exit mobile version