चार जण गंभीर जखमी
। अमरावती । प्रतिनिधी ।
अमरावती-मार्डी मार्गावरील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलसमोर गुरुवारी (दि.27) रात्री भीषण अपघात घडला. दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
वासंती अनिल सरोदे (वय 50, जिजाऊ कॉलनी, अर्जुननगर) व पंकज खुशालराव मेश्राम (वय 36, रा. प्रवीण रेसिडेन्सी, तपोवन, अमरावती) अशी अपघातातील मृत शिक्षकांची नावे आहेत. तर वासंती सरोदे यांचे पती अनिल पंजाबराव सरोदे (60) यांच्यासह दुसऱ्या कारमधील रामचंद्र तराळे, ऋषीकेश दीपक बौद्र (रा. कासारखेडा) हे चार जण जखमी झाले आहेत.
पंकज मेश्राम व वासंती सरोदे हे दोघे आर्वी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. ते कारने दररोज आवी-अमरावतीला ये-जा करत होते. गुरुवारी शाळेतील कामकाज आटोपल्यानंतर पंकज मेश्राम, वासंती व अनिल सरोदे असे तिघे कारने आर्वीहून अमरावतीला येत होते. मार्डी मार्गावरील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलनजीकच्या वळणावर अमरावतीहून वर्धेला जाणाऱ्या कारला समोरासमोर धडक बसली. या अपघातात दोन्ही कार रस्त्याच्या दोन्ही कडेला फेकल्या गेल्या. यात वासंती सरोदे आणि पंकज मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.







