विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू; एक जखमी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील साळोखवाडी येथे शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या तिघांना विजेच्या तारांचा धक्का लागला. यात दोघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सावेले ग्रामपंचायत मध्ये बारणे गावच्या पुढे साळोख वाडी आहे. त्या वाडीमध्ये राहणारे रामचंद्र वाघमारे हे घरच्या बाजूला असलेल्या शेवग्याच्या शेंगा करण्यासाठी झाडावर चढले. त्या झाडाच्या बाजूने महावितरण विजेचा प्रवाह जात होता. मात्र, पाऊस पडत असल्याने विजेच्या तारा या खाली लोंबकळत होत्या आणि त्याची माहिती वाघमारे यांना नव्हती. त्यावेळी शेवग्याच्या शेंगा काढणारे रामचंद्र वाघमारे आणि शेंगा घेण्यासाठी झाडाखाली असलेल्या पार्वती वाघमारे तसेच सुनीता वाघमारे यांना त्या विजेच्या तारांचा धक्का बसला. विजेच्या तारांचा जोरदार धक्का लागल्याने रामचंद्र आणि पार्वती यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनीता वाघमारे ह्या जखमी झाल्या. स्थानिकांनी सुनीता यांना तत्काळ कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच कर्जत तहसीलदार डॉ. धनजंय जाधव तसेच महसूल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, जखमी असलेल्या सुनीता यांच्यावर उपचारा सुरू आहेत. कर्जत तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आलेल्या महापुरात नेरळ जवळील बीरडोळे येथील शेतावर गेलेला मुलगा याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. आता ही दुसरी घटना असून, कर्जत तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या तीन वर पोहचली आहे.

Exit mobile version