। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
बांधकाम साइटवर ढिगारा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड बायपासवरील गोदावरी टी पाइंटजवळील कॅपिटल ट्रेड सेंटरच्या (सीटीसी) साइटवर मंगळवारी (दि. 8) सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड बायपासवरील गोदावरी टी पॉइंटच्या उड्डाणपुलाला लागूनच सातारा पोलीस ठाण्याकडे जाणार्या आमदार रोडच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत उभारली जात आहे. या भिंतीचे काम करण्यासाठी पाच मजूर लोखंडी जाळी उभारत होते. त्याचवेळी मुरूम आणि दगडांचा मोठा ढिगारा दरड कोसळल्यागत मजुरांच्या अंगावर पडला. यात दोन मजूर हे थेट ढिगार्याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर काहीसे बाजूला असलेल्या मजुरांनी उड्या मारून आपला जीव वाचविला. मात्र, यात ते गंभीर जखमी झाले. साइटवरील लोकांनी या मजुरांना तत्काळ बीड बायपासवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून दोघांना घाटीत हलविले. घाटीच्या डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अरविंदकुमार मंडळ (39) आणि पशुपती मंडल (45) अशी मृत मजुरांची नावे आहेत. तर निमीलाल मंडल (27), तपेंद्र मंडल (26) आणि मुलेंदर मंडल (27) हे तिघे जखमी असून ते बिहार येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली.